रावेर पोलीस स्टेशनची २४ तासांत कारवाई
रावेर (प्रतिनिधी) :- तालुक्यात पिंप्रीनांदू येथून रावेरला येणाऱ्या एका प्रवाशी महिलेची पर्स प्रवासादरम्यान चोरीस गेली होती. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी तपासचक्रे फिरवून संशयित आरोपी महिलेला २४ तासात अटक केली. तिच्याकडून ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संशयित महिलेला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून तिची जळगाव कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. येथील गांधी चौकातील रहिवासी नरेंद्र हरी तायडे यांची बहिण पिंप्रीनांदू येथून रावेरकडे येणाऱ्या मुक्ताईनगर-रावेर बसने रावेरकडे येत होती. रावेर बसस्थानकावर पर्स चोरी झाल्याचे या प्रवाशी महिलेच्या लक्षात आले.(केसीएन)या पर्समध्ये ४० हजार रुपये किमतीची ५ ग्राम सोन्याची चैन, २ हजार रुपये किमतीचे चांदीचे जोडवे, ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज होता.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी एपीआय मीरा देशमुख, गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी कल्पेश आमोदकर, सचिन घुगे, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, विशाल पाटील, महेश मोगरे, संभाजी बिजागरे याचे पथक तपासाठी नियुक्त केले.या पथकाने मुक्ताईनगर ते रावेर तसेच बऱ्हाणपूर, शहापूर येथील सुमारे २० सीसीटीव्ही तपासले असता आरोपी महिलेच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. महिलेला ताब्यात घेवून चौकशी केळी असता गुन्ह्याची कबुली देत चोरलेला ऐवज पोलिसांना काढून दिला. ही आरोपी महिला मुक्ताईनगर तालुक्यातील असून तिला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास एपीआय मीरा देशमुख करीत आहेत.