मुक्ताईनगर तालुक्यात कुऱ्हा काकोडा रस्त्यावर घटना
मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथून बाजार करून गावी परतणाऱ्या एका ८३ वर्षीय वृद्धाला भरधाव वेगाने येणाऱ्या बसने चिरडले. हा अपघात बुधवारी, २४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडला. गंभीर जखमी अवस्थेत वृद्धाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
सुपडा निनू सोनवणे (वय ८३, रा. निमखेडी बुद्रुक, ता. मुक्ताईनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सुपडा सोनवणे हे पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडांसह निमखेडी बुद्रुक येथे वास्तव्याला होते. बुधवारी कुऱ्हाकाकोडा येथे बाजार असल्याने ते बाजारात गेले होते. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास बाजार आटोपून सुपडा सोनवणे हे पायी घरी परतत होते. त्याच वेळी (एमएच २० बीएल १७७०) या क्रमांकाची बस भरधाव वेगाने आली आणि तिने सोनवणे यांना जोरदार धडक दिली. धडकेमुळे सोनवणे हे गंभीर जखमी झाले.
जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या अपघाताची माहिती मिळताच सोनवणे यांच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली होती. या दुर्घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या अपघातामुळे निमखेडी बुद्रुक आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.