जळगाव-भुसावळ महामार्गावरील कंडारी फाटा येथे घटना
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव-भुसावळ महामार्गावरील कंडारी फाटा (उमाळा) येथे शनिवारी दुपारी एका भीषण रस्ते अपघातात ६० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. भरधाव बसने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने हा थरार घडला.

प्रल्हाद अमृत बाविस्कर (वय ६०, रा. मण्यारखेडा, ता. भुसावळ) हे पत्नी सुनिताबाई प्रल्हाद बाविस्कर (वय ५२) यांच्यासह त्यांच्या ‘स्प्लेंडर प्लस’ मोटारसायकलने (क्रमांक: एमएच १९ ईडी ९३३९) उमाळा फाट्याकडून मण्यारखेड्याकडे जात होते. दुपारी ४:४० वाजेच्या सुमारास, पाठीमागून येणाऱ्या बसने (क्रमांक: एम एच १९ ७४०१) बाविस्कर यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील प्रल्हाद बाविस्कर हे उडून जळगावकडून येणाऱ्या एका कंटेनरच्या पुढच्या चाकाखाली आले. कंटेनरचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात प्रल्हाद बाविस्कर यांच्या पत्नी सुनिताबाई या देखील रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्यांच्या हाता-पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात त्यांच्या दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याप्रकरणी मृताचे चुलत भाऊ बाबुराव नामदेव बाविस्कर (वय ६७) यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन, जळगाव येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बस चालक सचिन भारत बागुल (वय ४१, रा. रावेर) याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने आणि भरधाव वेगाने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकुंद पाटील एमआयडीसी पोलीस स्टेशन, जळगाव हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









