जळगाव ( प्रतिनिधी ) – आज एस टी महामंडळाने काही बसेस सुरु केल्यावर त्यापैकी चोपड्याला जाणाऱ्या बसवर ममुराबादजवळच्या रेणुकामाता मंदिराजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली . धुळे आगारातून बाहेर जात असलेल्या चार बसेसवरही अशीच दगडफेक झाल्याचे वृत्त आहे . या घटनेमुळे सामान्य जनतेतही राज्य सरकारच्या एस टी कर्मचाऱ्यांविषयीच्या उदासीनतेच्या भूमिकेबद्दल रोष वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे
एस टी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे प्रतीक्षा यादीतील ३८ चालक व वाहकांना कामावर बोलावून आजपासून जळगाव आगारातून बसेस काही मार्गांवर सोडण्यात आल्या . यापैकी चोपडा मार्गावर एक बस जळगाव आगारातून दुपारी सोडण्यात आली ही बस चोपड्याकडे जात असताना ममुराबादजवळच्या रेणुकामाता मंदिराजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली आणि काचा फोडल्या . या बसवर आजच रुजू करून घेतलेले चालक आणि वाहक नेमलेले होते.
या घटनेची माहिती कळल्यावर एस टी चे विभाग नियंत्रक भगवान जोगणार आणि त्यांचे सहकारी अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले . अज्ञात व्यक्तींच्या विरोधात पोलिसांकडे गुन्हा नोंदवला जाणार आहे . ( क्रमांक – एम एच २० – बी एल – ३३६१ ) क्रमांकाची ही बस आहे .
दरम्यान धुळे आगार बसस्थानकातून चार बस सोडल्यानंतर मार्गस्थ झाल्या. परंतु, या चार बसवर अज्ञातानी हल्ला करत बस फोडल्याचा प्रकार घडला.
धुळे परिवहन विभागातर्फे यापूर्वीच एसटी भरतीमध्ये निवड झालेल्या परंतु अद्यापपर्यंत सेवेत रुजू न करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करून घेत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. धुळे एसटी आगारातून एसटी बस बाहेर पडत असताना आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश बघावयास मिळाला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना न जाणून घेता प्रशासनातर्फे बसेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
१४ दिवसानंतर आज धुळे एसटी आगारातून लालपरी मार्गस्थ करण्यात आली होती. सकाळी पोलिसांचा मोठा फौजफाटामध्ये या बसेस आगारा बाहेर पडल्या. परंतु या बस आपल्या मार्गावर मार्गस्थ होत असताना अज्ञातांनी चार बसवर दगडफेक केली आहे. त्यामध्ये एक एसटी चालक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.