बऱ्हाणपुरातून नोटा पुरवणारा तरुण बेपत्ता
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील जिल्हा पेठ पोलिसांनी आर. आर. विद्यालय परिसरातून एका तरुणाला बनावट नोटांसह अटक केली होती. या गुन्ह्यात आणखी एका तरुणाला अटक झाली असून बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पोलीस शोध घेत आहेत.
चेतन शांताराम सावकारे (वय २७, रा. यावल) याला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून ४८,५०० रुपये दराच्या ५०० रुपयांच्या ९७ बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. तसेच यावल येथील शेख नईम शेख बरुउद्दीन यालाही अटक केली आहे. चेतनने नईमकडून बनावट नोटा घेतल्या होत्या. दरम्यान, नईमला नोटा देणारा बऱ्हाणपूर येथील तिसरा तरुण मात्र गेल्या महिनाभरापासून गायब झाला आहे. जिल्हापेठ पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर दोघांना पुढील तपासासाठी बऱ्हाणपूर येथे नेले होते.
मात्र नोटा पुरविणारा तरुण महिनाभरापूर्वी गायब झालेला आहे. त्यांनी आणखी किती जणांना, किती बनावट नोटा दिल्या आहेत? या नोटांची छपाई कोणत्या ठिकाणी सुरू आहे? याची माहिती जिल्हापेठ पोलिस घेत आहेत. पोलिसांनी चेतन व नईम यांना न्यायालयात हजर करुन पोलिस कोठडी मिळवली आहे.