चोपडा शहरात घटना सीसीटीव्हीत कैद, गुन्हा दाखल
चोपडा ( प्रतिनिधी ) – शहरातील बँक ऑफ इंडिया शाखेत आरडीचे चलन भरत असताना एका ६४ वर्षीय वृद्धाच्या पिशवीतून ५० हजार रुपये चोरून तीन अनोळखी महिला पसार झाल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, चोपडा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मधुकर पंढरीनाथ पाटील (वय ६४, रा. त्र्यंबक नगर, चोपडा) हे दिनांक १९ जून रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास एम.जी. कॉलेजसमोरील बँक ऑफ इंडिया शाखेत गेले होते. त्यांनी बँक खात्यातून ८० हजार रुपये रोख रक्कम काढली आणि ती एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवली.(केसीएन)त्यानंतर ते आरडीचे चलन भरण्यासाठी चलन काउंटरवर उभे असताना अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील तीन अनोळखी महिलांनी संगनमताने त्यांच्या हातात असलेली प्लास्टिकची पिशवी अर्धवट कापून त्यातील ८० हजार रुपयांपैकी ५० हजार रुपयांचे (५०० रुपयांच्या नोटांचे बंडल) चोरून नेले.
या प्रकरणी मधुकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोपडा शहर पोलिस ठाण्यात तीन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार हर्षल पाटील करत आहेत. बँकेतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.









