जळगाव शहरातील घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
जळगाव (प्रतिनिधी) :- एका खासगी बँकेतील धनादेश पेटीतून (चेक ड्रॉप बॉक्स) धनादेश चोरून, त्यावर रासायनिक प्रक्रियाद्वारे स्वतःचे नाव टाकून ते धनादेश राज्यातील इतर बँक खात्यामधून वटवून २ लाख ५८ हजार रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात एका अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विसनजी नगरातील बँक ऑफ बडोदा येथे ग्राहकांच्या सुविधेसाठी धनादेश पेटी (चेक ड्रॉप बॉक्स) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बँकेकडून दिवसातून ३ वेळा या पेटीत असलेले धनादेश काढून त्यावर पुढील कार्यवाही केली जाते. ४ ते ७ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या बँकेत काही ग्राहकांनी लेखी तक्रार देत त्यांच्या खात्यात त्यांनी २२ व २३ ऑक्टोबर रोजी धनादेश व डिमांड ड्राफ्ट वटले गेले नसून त्याची रक्कमदेखील त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची तक्रार केली होती. त्यानुसार तक्रारदारांच्या अर्जाची दखल घेत बँकेने चौकशी केली असता, त्यांना कार्यालयीन कामकाजात कुठलाही दोष आढळून आली नाही.
मात्र, ज्या खातेदारांच्या नावाने धनादेश दिला होता, त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर त्या धनादेशावरील नाव रासायनिक पद्धतीने मिटवून त्यावर बोगस अनोळखी व्यक्तीचे नाव टाकून ते धनादेश इतर राज्यातील दुसऱ्या बँकेत जमा झाल्याचे उघड झाले. बँकेकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. यामध्ये दोन्ही दिवशी दोन वेगवेगळ्या व्यक्ती बँकेतील धनादेश पेटीतून धनादेश काढून त्याचे कुलूप पूर्ववत लावत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी शनिवारी मुख्य प्रबंधक विमलेश कुमार वर्मा यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.