पुणे ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 21 ऑक्टोबर रोजी दुपारी 5 जणांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे . आरोपींनी कॅशियर, कर्मचारी व ग्राहकांना पिस्तुलाचा धाक दाखवून 32 लाख 52 हजार 560 रुपयांची रोकड आणि 2 कोटी 47 लाख 20 हजार 390 रुपये किंमतीचे 824 तोळे सोने असा एकूण 2 कोटी 79 लाख 72 हजार 950 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली होती.
डॉलर उर्फ प्रविण ओव्हळ (वय-29 रा. वाळद, ता. खेड), अंकुश पाबळे (वय-24 रा. कावळपिंपरी, ता. जुन्नर), धोंडीबा जाधव (वय-29 रा. निघोज कुंड, ता. पारनेर, जि. नगर), आदिनाथ पठारे (वय-25 रा. पठारवाडी, ता. पारनेर), विकास गुंजाळ (वय-20 रा. टाकळी हाजी, ता. शिरुर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रविण ओव्हाळ हा टोळी प्रमुख असून त्याला पारनेर तालुक्यातील निघोज येथून अटक केली. आरोपींकडून 2 कोटी 19 लाख 15 हजार 370 रुपये किंमतीचे 7 किलो 32 तोळे दागिने आणि 18 लाख 27 हजार 590 रुपये रोख असा एकूण 2 कोटी 36 लाख 42 हजार 960 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपींनी बँकेवर दरोडा टाकण्यासाठी तीन महिन्यांपासून पुर्वतयारी केली होती. त्यासाठी टोळी प्रमुख ओव्हाळ याने मध्यप्रदेशातून तीन पिस्टल आणल्या होत्या. दोन वाहनांचा वापर करण्यात आला. त्यापैकी मॅटेलीक ग्रे रंगाची सियाज कार (एमएच 05 सीएम 1293) होती गुन्ह्यात वापरण्यासाठी तिचा रंग पांढरा करुन घेतला. गुन्हा केल्यानंतर पुन्हा रंग बदल्यासाठी मध्यप्रदेश येथे नेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरोडा टाकल्यानंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी सियाज गाडीमधील मुद्देमाल बोलेनो (एमएच 14 एसएम 0707) मध्ये टाकून लंपास केला.
आरोपींनी ओळख लपून रहवी यासाठी गुन्हा करण्यापूर्वी एकाच प्रकारची जॅकेट, शुज, ट्रॅक पॅन्ट, हॅण्डग्लोव्हज, मास्क असे कपडे खरेदी केले होते. दरोडा टाकल्यानंतर हे सर्व कपडे जाळून टाकण्यात आले.
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेतील पो नि अशोक शेळके , स पो नि सचिन काळे, संदिप येळे, नेताजी गंधारे, पृथ्वीराज ताटे, पो उ नि अमोल गोरे,रामेश्वर धोंडगे, स फौ तुषार पंधारे, शब्बीर पठाण, हवालदार जनार्दन शेळके, राजु मोमीन, दिपक साबळे, विक्रम तापकी, सचिन घाडगे, विजय कांचन, अजय घुले, अनिल काळे, रविराज कोकरे, पो ना योगेश नागरगोजे, गुरु जाधव अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, स फौ विजय माळी, प्रकाश वाघमारे, काशीनाथ राजापुरे, मुकुंद कदम, प्रमोद नवले, प्रसन्न घाडगे, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, संदिप वारे, धिरज जाधव, मंगेश भगत, अमोल शेडगे, प्राण येवले, बाळासाहेब खडके, पो कॉ पुनम गुंड, समाधान नाईकनवरे, दगडु विरकर , पो नि सुरेश कुमार राऊत , स पो नि संदिप कांबळे, पो उ नि जगदाळे, पडळकर, जाधव, चरापले, स फौ पठाणे, हवालदार भगत, अमित कडूस,साठे, नितीन सुद्रीक, बाळासाहेब भवर, शिंदे, जगताप, संजु जाधव, नागलोत, नेमाणे, साळवे, जंगम, गुणवरे, पिठले, साळुंके यांनी केला .