नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – देशातील सरकारी बँक कर्मचारी 16 आणि 17 डिसेंबर असे दोन दिवस संपावर जाणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने संपाचा इशारा दिलाय. बँकांच्या खासगीकरणाच्या निषेधार्थ हा संप होत आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2021 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात दोन बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली होती, त्याची तयारी आता सरकारने सुरू केलीय. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बँकिंग कायदे (दुरुस्ती) विधेयक 2021 आणण्याची तयारी सुरू आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने या संपाची घोषणा केलीय. सार्वजनिक क्षेत्रातील नऊ बँकांच्या युनियनचा हा संयुक्त मंच आहे. खासगीकरणापूर्वी या बँका त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आकर्षक स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना आणू शकतात.देशातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका, त्यांचे सर्व कामकाज संसदीय कायद्याद्वारे नियंत्रित केले जाते. या बँका खासगी होताच संसदेची सक्ती संपते. सरकारी विमा कंपनी LIC ने IDBI बँकेतील 51 टक्के हिस्सा विकत घेतलाय. आता त्याच्या निर्गुंतवणुकीचे काम सुरू झालेय.