पारोळा तालुक्यातील शेळावे येथील घटना
पारोळा (प्रतिनिधी) :- कामानिमित्ताने काही वेळाकरिता बाहेर गेले असता घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी तब्बल एक लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना तालुक्यातील शेळावे बुद्रूक येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेळावे बुद्रूक येथील किरण बिऱ्हाडे यांच्या घरी दिवाळीनिमित्त नातेवाईक आले होते. या दरम्यान त्यांनी घरातील भिंतीवर एका पर्समध्ये कानातले टोंगल, अंगठ्या आदी सुमारे एक लाख रुपये सोन्याचे दागिने ठेवलेले होते. घरातील सर्व जण १८ नोव्हेंबरला घराला कुलूप लावून कामानिमित्त अमळनेर येथे गेले होते. त्यांच्या मागे घर बंद असल्याचा फायदा घेऊन दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडत आत प्रवेश केला व घरातील दागिण्यांची पर्स चोरुन नेली. बिऱ्हाडे कुटुंबीय सायंकाळी चारला घरी परतले. यावेळी त्यांना घरातील दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी २३ नोव्हेंबरला पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.