चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील उंबरखेड येथे एकाच रात्री ३ घरे फोडून चोरट्यांनी लाखाचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
उंबरखेड येथे गल्ली नंबर ६ मधील जिजाबाई लक्ष्मण येवले, दगडू जगताप आणि रामदास चैत्राम गायकवाड यांच्या तीनही बंद घरांचा फायदा घेऊन चोरट्यांनी दरवाजाचा कोयंडा कटरच्या साहाय्याने कापून घरात प्रवेश केला. दगडू जगताप यांच्या घरातील हॉलमध्येच लोखंडी कपाटातील वस्तू इतस्ततः फेकून दिल्या. यानंतर शेजारच्या जिजाबाई लक्ष्मण येवले यांच्या घरातील तिजोरी तोडून आतील किरकोळ पैसे, चांदीच्या वस्तू घेऊन चोरटे पसार झाले. त्यानंतर बैंक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचारी रामदास चैत्राम गायकवाड यांच्या घरातले लोखंडी कपाट तोडून त्यातील ६५ हजार रुपये रोख आणि सात ग्रॅम सोने घेऊन चोरटे पसार झाले. चोरट्यांनी काही दिवस आधी घराची रेकी केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन-तीन महिन्यापूर्वी मनोहर दामोदर येवले, विठ्ठल दामोदर येवले, दादा पांडू पाटील यांच्या घराचा ही कोयंडा तोडून ६० हजार रुपयांची चोरी झाली होती. सलग चोरीमुळे उंबरखेड परिसरात सध्या भीतीचे वातावरण आहे.