चाळीसगाव शहरातील घटना
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे चार लाखांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना शहरातील नारायणवाडी परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली असून, भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, नारायणवाडीतील मंगलाबाई दत्तात्रय नागणे (वय ५८) यांच्या जेता सायन्स अकॅडमीजवळील घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. ही घटना मंगळवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १२.४० या वेळेत घडल्याचे समोर आले आहे. घरातील लाकडी कपाट उघडून त्यामधील दागिन्यांची चोरी करण्यात आली.
चोरट्यांनी अडीच लाख रुपये किंमतीची सुमारे ५० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ३० हजारांची सहा ग्रॅमची अंगठी, ६० हजारांची दहा ग्रॅमची बोरमाळ, २० हजारांचे चार ग्रॅमचे टाप्स तसेच ४० हजारांची २५० ग्रॅम वजनाची चांदीची पैंजण असा एकूण सुमारे चार लाखांचा ऐवज चोरून नेला.
घटनेच्या वेळी मंगलाबाई नागणे या जयलक्ष्मी माता नावाचे पूजा साहित्याचे दुकान चालवितात आणि त्या दिवशी गॅस सिलिंडर केवायसीसाठी एजन्सीकडे गेल्या होत्या. परत आल्यावर त्यांनी दरवाज्याचा कडीकोयंडा तुटलेला व कुलूप खाली पडलेले पाहिले. आत पाहणी केल्यावर कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा ऐवज चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









