जामनेर तालुक्यातील सामरोद येथे धाडसी घरफोडी
जामनेर (प्रतिनिधी): तालुक्यातील सामरोद येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत १ लाख ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामरोद येथील रहिवासी बबलू रमेश झालटे (वय ३३) हे दि. ९ जानेवारी २०२६ च्या रात्री आपल्या घरात झोपलेले होते. रात्री ११.३० ते १० जानेवारीच्या पहाटे ५.०० वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खालच्या खोलीच्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. एकूण मुद्देमाल १,४५,०००/- रुपये चोरून नेला आहे.
बबलू झालटे यांनी १० जानेवारी रोजी दुपारी १ वाजता जामनेर पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी तपासाच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदेश किर्तीकर करत आहेत.









