जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील अशोक नगर भागात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३० हजार रुपयांच्या चांदीच्या मूर्त्या चोरून नेल्याची घटना गुरुवारी (१३ नोव्हेंबर) पहाटे उघडकीस आली. वाढत्या घरफोड्यांमुळे परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेमंत विजय महाजन (वय ३९, रा. अशोक नगर) हे आपल्या कुटुंबियांसह राहत असून, १२ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता ते घर बंद करून बाहेर गेले होते. याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी संधी साधत त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील सुमारे ३० हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या मूर्त्या पळविल्या.
हा प्रकार गुरुवारी सकाळी ६ वाजता उघडकीला आला. घराची अवस्था पाहताच हेमंत महाजन यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून पुढील तपास पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी करीत आहेत.









