जळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील अयोध्या नगर येथील श्री प्लाझा अपार्टमेंट येथे शनिवारी सकाळी ८ ते दुपारी दीड वाजता दरम्यान बंद घर पाहून चोरट्यांनी कडीकोंडा तोडून घरफोडी केली. यामध्ये दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विलास तुकाराम चौधरी (वय ४४, रा. श्री प्लाझा अपार्टमेंट, अयोध्या नगर, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. विलास चौधरी यांच्या घरी शनिवारी दि. १९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेपासून ते दुपारी दीड वाजेच्या दरम्यान कोणीही नसताना अज्ञात चोरट्यांनी संधी साधली. त्यांनी घराच्या दरवाज्याची कडी तोडून कुलूप उघडून घरात प्रवेश केला.(केसीएन)गोदरेज कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, अंगठी, तीन चांदीचे बिस्किट असा एकूण १ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. दुपारी विलास चौधरी यांचे कुटुंबीय घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शनिवारी दि. १९ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राहुल तायडे हे करीत आहेत.









