जळगाव शहरातील मुक्ताईनगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : दुय्यम निबंधक कार्यालयात लिपिक असलेल्या महिला अधिकाऱ्याच्या घरी चोरट्याने हजेरी लावली. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी साडेतेरा ग्रॅम सोन्याचे दागिने व ९० हजार रुपये रोख असा जवळपास अडीच लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना मुक्ताईनगरात उघडकीस आली आहे. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैशाली अरुण वाडेकर (वय ४५, रा. मुक्ताईनगर) या दुय्यम निबंधक कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून नोकरीला आहेत. मुलगी ऋतुजा यांच्यासोबत त्या मुक्ताईनगरात वास्तव्याला आहेत. शेजारीच आत्या शोभा सोनवणे राहतात. घरी दोघेच राहत असल्याने २० ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता त्या मुलीसह आत्याकडे झोपायला गेल्या. सोन्याचे काही दागिने घरातील कपाटात ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर घरी गेल्या असता मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले होते.
कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. त्यातील रोख ९० हजार रुपये, अडीच ग्रॅम सोन्याची अंगठी, सात ग्रॅमचे कानातील सोन्याचे झुमके, चार ग्रॅमची कानातील सोन्याची वेल व तीन ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरी गेला होता. वैशाली वाडेकर यांनी ही माहिती ओळखीचे अशोक महाजन यांना दिली. जिल्हा पेठ पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.