जळगाव शहरात वाघ नगरात डॉक्टरांच्या घरी चोरी
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील वाघ नगरात राहणाऱ्या एका डॉक्टरचे बंद घर फोडून घरातून सोन्याच्या वस्तू, सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर व राउटर असा एकुण ६५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता समोर आली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील वाघ नगर परिसरात पुरूषोत्तम भगवान पाटील (वय ४०) हे परिवारासह वास्तव्याला आहेत. वैद्यकीय सेवा देवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दिनांक १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याच्या वस्तू, सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर आणि राऊटर असा एकुण ६५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर डॉ. पुरूषोत्तम पाटील यांनी जळगाव तालुका पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गुलाब माळी हे करीत आहे.