जामनेर शहरातील नवकार प्लाजा येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) :- शहरातील शिक्षक दाम्पत्याचे घर बंद पाहून चोरटयांनी डाव साधत भरदिवसा चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम लंपास केली असून ही धाडसी चोरी चोरट्यांनी सीसीटीव्ही तोडून केली आहे. जामनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बेस्ट बाजार, नवकार प्लाझा येथील शिक्षक दांपत्याच्या घरात दि. १९ मे रोजी, गुरुवारी सकाळी साधारणतः ९ ते १० वाजेदरम्यान ही घटना घडली. शिक्षक किरण श्रीराम महाजन आणि त्यांच्या पत्नी दोघेही शिक्षक असल्याने सकाळी साडेसहा वाजता शाळेसाठी घराला कुलूप लावून बाहेर पडले होते. ही संधी साधत चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला व वीस हजार रुपये रोख आणि ५० ग्रॅम सोने चोरून नेले. चोरट्यांनी इमारतीच्या परिसरातील सीसीटीव्ही तोडून चोरी केली असल्याचे किरण महाजन यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, सचिन महाजन, दीपक जाधव, आणि राहुल महाजन यांनी घटनास्थळी धाव घेतली. फिंगरप्रिंट पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने घटनास्थळी तपास सुरू आहे. किरण महाजन यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांचा शोध सुरू असून प्रकरणाचा तपास चालू आहे.