जळगावातील खंडेराव नगर परिसरातील घटना, पोलिसांकडून शोध सुरु
जळगाव (प्रतिनिधी) : येथील खंडेराव नगर परिसरात आरएमएस कॉलनीजवळ नाल्यात पडलेला चेंडू घेण्यासाठी वाहत्या पाण्यात उतरलेला बालक वाहून गेल्यामुळे तो बेपत्ता झाल्याची हृदयद्रावक घटना दि. ६ जुलै रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या दरम्यान उघड झाल्याने जळगावात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बालकाचा शोध सुरु आहे.
सचिन राहुल पवार (वय ६, रा. हरिविठल नगर, नवनाथ मंदिराजवळ, जळगाव, मूळ रा. कुसुमबा ता. रावेर) असे मयत बालकाचे नाव आहे. हरिविठ्ठल नगरात राहुल किसन पवार (वय ३२) हे मोलमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांना पत्नी, १ मुलगा सचिन, १ मुलगी असा परिवार आहे. (केसीएन)शनिवारी दि. ६ जुलै रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या दरम्यान, खंडेराव नगर परिसरात सचिन पवार हा बालक त्याची १० वर्षाची बहीण आणि परिसरातील लहान मुलांसह लिंबू तोडायला गेला होते. त्याठिकाणी ते चेंडू खेळू लागले. खेळताना अचानक चेंडू जवळच्या नाल्यात पडला. तो घेण्यासाठी सचिन पवार हा नाल्यात उतरला.
मात्र नुकताच पाऊस पडल्याने व नाल्यातील पाण्याचा प्रवाह जोरात वाहत असल्याने निष्पाप सचिनला त्याची कल्पना आली नाही. तो वाहत्या पाण्यात वाहून गेला. यावेळी लहान मुलांनी आरडाओरडा करून नागरिकांनी माहिती दिली.(केसीएन)सचिनचे कुटुंबीयदेखील घटनास्थळी आले. रामानंद नगर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांना बोलावून सचिन पवारचा शोध सुरु केला आहे. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा सचिनचा मृतदेह हाती आला नव्हता. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली असून सचिनचे कुटुंबियांना धक्का बसला आहे.