‘जीएमसी’मध्ये “डीईआयसी”त बाल अस्थिरोग शिबिर, मुंबईच्या तज्ज्ञ डॉक्टरांची तपासणी
जळगाव (प्रतिनिधी) :- लहान मुलांमध्ये हाडांच्या संदर्भात विविध आजार जाणवतात. लक्षणे दिसताच पालकांनी शासकीय रुग्णालयात दाखविण्यासाठी यावे. लवकर निदान झाल्यास लवकर उपचार शक्य होतात, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये राष्ट्रीय बालस्वास्थ्य केंद्र, मुस्कान चॅरिटेबल ट्रस्ट व ज्युपिटर हॉस्पिटल, मुंबई यांच्या सहकार्याने शनिवार दि. २८ ऑक्टोबर रोजी बाल अस्थिरोग व सेरेब्रल पाल्सीबाबत मोफत शिबिर जिल्हा जलद हस्तक्षेप केंद्र (डीईआयसी) येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये लहान मुलांमध्ये असलेले हाडांच्या संदर्भातील आजार याबाबत पूर्व तपासणी करण्यात आली. सुरुवातीला अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी शिबिराविषयी दिलेला संदेश यावेळी वाचून दाखविण्यात आला. त्यानंतर डीईआयसी व्यवस्थापक दर्शन लोखंडे यांनी प्रस्तावनेतून उपक्रमाविषयी माहिती सांगितली.
यानंतर मुंबई येथील प्रसिद्ध बाल अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. तरल नागडा व त्यांचे सहकारी डॉ. जयदीपसिंग धमेले यांनी, हातपाय वाकडे असणे, बोटांची रचना व्यवस्थित नसणे, हाडांसंदर्भात व्यंग असणे याबाबतच्या विविध समस्यांविषयी पूर्व तपासणी केली. प्रसंगी पालकांना मार्गदर्शनदेखील केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अस्थिव्यंगोपचार विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. राजेंद्र अग्रवाल, बालरोगतज्ज्ञ डॉ. अतुल गाजरे उपस्थित होते.
शिबिरात ८३ बालकांची अस्थिव्यंगाबाबत तपासणी करण्यात आली. सूत्रसंचालन जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी यांनी केले. आभार ज्युपिटर रुग्णालयाचे हरीश पाटील यांनी मानले. यावेळी डॉ. प्रणव समरुतवार, डॉ. स्नेहा नेमाडे, गौरव तायडे, राजश्री वाघ, जयाप्रदा पाटील, रणजित गव्हाळे, जुनैद शेख, डॉ. अहमद देशमुख, परिचारिका शीतल फालक, प्रकाश पाटील यांचे सहकार्य लाभले.