यावल तालुक्यात किनगाव भागात घडली घटना, वनविभागाविरुद्ध ग्रामस्थ संतप्त
यावल (प्रतिनिधी) : जळगाव वन विभागाच्या कार्यक्षेत्रात गुरुवारी दि. ६ मार्च रोजी दुपारी २ ते ३.३० च्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यामुळे ७ वर्षीय आदिवासी बालकाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. वनविभागाने उशिरा पंचनामा केल्याची माहिती मिळाली.
यावल येथील पश्चिम वनक्षेत्रपाल सुनील भिलावे यांच्या कार्यक्षेत्रातील हि घटना आहे. गानकी शिवारात केशा प्रेमा बारेला (वय ७) हा मुलगा आईसोबत जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. अचानक हल्ला करत बिबट्याने मुलाला आईच्या हातातून खेचून नेले आणि गंभीर जखमी केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने साकळी-किनगाव परिसरासह संपूर्ण यावल तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात असून, वनविभागाच्या हलगर्जी कारभारावर गंभीर आरोप होत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरिक आणि माध्यम प्रतिनिधींनी पश्चिम वन विभागाचे वनक्षेत्रपाल सुनील भिलावे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून, स्थानिक आदिवासी बांधव आणि ग्रामस्थांनी वनविभागाच्या निष्काळजी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून बिबट्याविषयी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
मयत अल्पवयीन आदिवासी मुलाचे कुटुंब मध्य प्रदेश रहिवाशी होते. सहा महिन्यापूर्वी साकळी शिवारात मजुरीचे काम करायला आले होते. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. बिबट्या संदर्भात दक्ष राहण्याबाबत आजुबाजूच्या पंचक्रोशीत अलर्ट राहून दवंडी देण्याच्या सूचना तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी दिल्या आहेत. पाणी साठवण,ओढा येथे पिंजरे लावले जाणार आहेत.शेतामध्ये पाणी देण्याकरिता दिवसा वीज पुरवठा देण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना देण्यात आल्या. तसेच फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे.