धनवाडी रस्त्याजवळच्या पाटचारीत आढळली
चोपडा ( प्रतिनिधी ) – शहरातील रिद्धिसिद्धी कॉलनी परिसरात वास्तव्यास असलेली संजना गुड्डू बारेला (वय ९) चार दिवसांपासून बेपत्ता होती. शुक्रवारी दिनांक २० रोजी सकाळी सातच्या सुमारास तिचा मृतदेह धनवाडी रस्त्याजवळच्या पाटचारीत तरंगताना मिळून आला. पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे.
गुड्डू बारेला (मूळ रा. तरडी, ता. शिरपूर) शहरातील रिद्धिसिद्धी कॉलनी परिसरात पत्नी व मुलगी संजना (९) व मुलगा अजय (१२) यांच्यासह राहत होते. मंगळवारी दिनांक १७ रोजी दुपारी संजना मैत्रिणीसोबत खेळायला जाते, असे आईला सांगून घरातून निघाली. रात्री उशिरापर्यंत ती घरी परत न आल्याने घरच्यांनी तिचा शोध सुरू केला. ती कुठेही मिळून न आल्याने दुसऱ्या दिवशी शहर पोलिसांत ती हरविल्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी बेपत्ता संजनाचा कसून तपास सुरू केला. त्यासाठी समाजमाध्यमांचीही मदत घेतली. मात्र, ती कुठेही मिळून आली नाही.
शुक्रवारी दिनांक २० रोजी सकाळी सातच्या सुमारास संजनाचा मृतदेह धनवाडी रस्त्याजवळच्या पाटचारीतील पाण्यावर तरंगताना दिसला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविला. शवविच्छेदन करण्यात येऊन सायंकाळी शिरपूर तालुक्यातील तरडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तपास करीत आहे.