जखमी दोन्ही बहिणी जिल्हा रुग्णालयात दाखल
एरंडोल तालुक्यातील सावदे प्र.चा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – घराच्या छताला बांधलेल्या साडीच्या झोक्यात तीन्ही बहिणी खेळत होत्या. खेळता खेळता अचानक हा झोका तुटला. यात तीन्ही बहिणीपैकी एकीचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्या आहेत. एरंडोल तालुक्यातील सावदे प्र.चा. येथे शनिवारी दुपारी ही घटना घडली. अचर्ना धनसिंग पावरा वय -दीड वर्ष असे मयत बालिकेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार असे की, सावदे प्र.चा. येथे धनसिंग शीला पावरा हे वास्तव्यास आहेत. पंधरा वर्षांपासून गावातील शेतकऱ्यांची शेती बटाईने करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी सकाळी धनसिंग व त्याची पत्नी हे शेतात गेले तर धनसिंगची आई व त्याच्या तीन चिमुकल्या मुलीच घरी होत्या. कच्च्या विटांच्या घरावर लोखंडी पाईपाला साडीद्वारे केलेल्या झोक्यात तीनही मुली खेळत असतानाच अचानक साडीचा झोक तुटला. या घटनेत अर्चना पावरा हे दीड वर्षाची बालिकेच्या मृत्यू झाला व तिच्या साडे तीन वर्षे व पाच वर्ष वयाच्या दोन्ही बहिणी गंभीर जखमी झाल्या. दोघींवर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत अर्चना हिच्यावर सायंकाळी सावदे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.