दिग्गज कलाकार, गायक, वादकांच्या कलेचे होणार सादरीकरण
जळगाव (प्रतिनिधी) :- भारतीच अभिजात संगीताचा खानदेशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन स्व, वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दि. ५,६,७ जानेवारी २०२४ रोजी करण्यात येणार आहे. हा महोत्सव छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात संध्याकाळी ७ ते ११ या वेळेत संपन्न होणार आहे. याबाबतची माहिती गुरुवारी ७ डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून साजरा होणान्या या २२ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. आहेत. भारतीय अभिजात संगीताच्या विश्वात जळगावचे नाव अधोरेखित करणाऱ्या या महोत्सवात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंतांना प्रतिष्ठानाने निमंत्रित करण्यात आलेले आहे.
महोत्सवाची सुरुवात दि. ५ जानेवारी रोजी उद्घाटन समारंभानंतर प्रथम सत्रात सा रे ग म प लिटिल चॅम्प्स फेम
बालकलाकार गायिका ज्ञानेश्वरी घाडगे हिच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने होणार आहे. तिला तिची बहीण कार्तिकी घाडगे संवादिनीवर तर रामकृष्ण करंबेळकर तबल्यावर साथसंगत करतील. द्वितीय सत्रात लखनऊ घराण्याचे प्रतिनिधित्व करणारे अनुज मिश्रा व नेहा मिश्रा यांच्या कथक जुगलबंदीने सादर होईल. त्यांना तबल्याची साथ लखनऊ चे पं. विवेक मिश्रा, सतारची साथ पंडिता अंजली गुर्जर, त्याचप्रमाणे सरोद, संवादिनी, व पडत साठी हृदय देसाई हे साथ संगत करतील.
द्वितीय दिनाच्या प्रथम सत्रात मुंबई च्या गायिका रौंकिणी गुप्ता या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सादर करतील, त्यांना तबल्यावर आशिष राघवानी तर संवादिनीवर दीपक मराठे साथ संगत करतील. द्वितीय सत्रात इंडिया गॉट सीजन १० मध्ये सादर होत असलेल्या रागा फ्युजन बैंडचे सादरीकरण तमाम जळगावकर रसिकांसाठी होणार आहे. यामध्ये अजय तिवारी (गायन) अमृतांशु दत्ता (स्लाईड गिटार) जयंत पटनाईक (पर्युशनिस्ट) हर्षित शंकर (बासरी) प्रीतम बोरुआ (बेस गिटारीस्ट) व जेरिन जयसन (ड्रमर) हे कलाकार आपली कला सादर करतील.
तृतीय दिनाचे प्रथम सत्र हे सहगायनाने संपन्न होणार असून पं. राजन साजन मिश्रा यांची पुढची पिढी अर्थात पं. रितेश व पं. रजनीश मिश्रा यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय युगल गायनाने संपन्न होईल. त्यांना तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनीवर अभिषेक रवंदे साथ संगत करतील. समारोपाच्या सत्रात पं. आदित्य ओक (संवादिनी) निनाद मुळावकर (बासरी) व विशाल धुमाळ (किबोर्ड) यांच्या जुगलबंदीने २२ व्या बालगंधर्व महोत्सवाची सांगता होईल. त्यांना तबल्यावर प्रथित यश तबलावादक विनायक नेटके साथ संगत करतील.
तीनही दिवसाचे सूत्रसंचालन मुंबईच्या सुसंवादिनी दीमी भागवत करणार आहेत. जळगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन या बालगंधर्व संगीत महोत्सवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन स्व वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व या महोत्सवाच्या विविध प्रायोजकांनी केले आहे.