अमळनेर येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : – भुसावळ सुरत पॅसेंजरमध्ये अवघ्या १ महिन्याच्या बाळाला टाकून आई वडील अमळनेर स्थानकावरून पसार झाल्याची घटना दिनांक९ रोजी रात्री घडली. अमळनेर पोलिस त्यांचा शोध घेत आहे.
भुसावळ सुरत पॅसेंजरमध्ये सर्वसाधारण बोगीत एक जोडपे अवघ्या एक महिन्याच्या बाळाला घेऊन धरणगाव स्टेशनवरून बसले. रेल्वे डब्यातच त्यांनी आपल्या बाळासाठी झोका बांधला. अमळनेर स्टेशन येताच बाळाला सोडून दोन्ही पती- पत्नी उतरून गेले. रेल्वे दोंडाईचापर्यंत गेल्यावर ही बाब प्रवाश्यांच्या लक्षात आली. त्यांनी रेल्वे पोलिसांना बोलावले. रेल्वे पोलीस अनिता चौधरी, अलका अढाळे यांनी बाळाला नंदूरबार रेल्वे स्थानकावर उतरवून जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत नंदुरबार रेल्वे स्थानकात अनिता चौधरी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास अलका अढाळे करीत आहेत.