जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील चिंचोली येथे भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरने महामार्ग ओलांडणाऱ्या तब्बल १५ बकऱ्यांना चिरडल्याची गंभीर घटना बुधवारी २८ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. ग्रामस्थांनी डंपरचालकाला पकडून एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
कैलास लटकन कोळी रा. चिंचोली हे गावात राहतात. त्यांच्याकडे २० ते २५ बकऱ्या आहे. बुधवारी २८ मार्च रोजी सकाळी रानात बकऱ्यांना चारून ते दुपारी चिंचोली गावात आले. त्यांच्यासोबत प्रभाकर इखे, गणेश धुमाळ, कैलास पालवे आणि दिदास बागले यांच्या मालकीच्याही बकऱ्या सोबत होत्या. गावाजवळून जळगाव औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे. यावेळी कैलास कोळी हे बकऱ्यांना महामार्गावरून ओलांडून नेत असतांना जामनेकर कडून जळगावकडे जाणारा डंपर क्रमांक (एमएच १९ वाय ७७७३) हा सुसाट वेगाने येत होत होता.
या डंपरने वाहन चालविताना निष्काळजीपणा करीत रस्ता ओलांडणाऱ्या बकऱ्यांना चिरडून टाकले. यात एकुण १५ बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनाची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थानी धाव घेतली व डंपरचालकाला ताब्यात घेतले. या अपघातात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, डंपरचालकाला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.