जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने बीओटी तत्वावर 192 गाळ्यांचे बांधकाम केले असून ते वादाच्या भोवर्यात सापडले आहे. यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याची तक्रार करण्यात आलेली आहे. याच्या चौक शीसाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालयाचे विभागीय उपसरव्यवस्थापक सी.एम. बारी यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता हेमंत पी. अत्तरदे व जळगावचे सहायक निबंधक व्ही.एम. गवळी हे सदस्य असलेली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. मात्र, कार्यालयीन व अतिरिक्त कामकाजामुळे पुरेसा वेळ देणे शक्य नसल्यामुळे समिती प्रमुख म्हणून काम करणे जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे चौकशीसाठी इतर समिती प्रमुखाची नियुक्ती करावी, असे पत्र बारी यांनी दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी पणन संचालकांना पत्र दिले आहे. पणन संचालकांनी बारी यांच्या ऐवजी जळगाव सहकारी संस्था उपनिबंधक विलास गावडे यांची नियुक्ती केली. सहायक निबंधक गवळी व कनिष्ठ अभियंता अत्तरदे हे समितीत कायम राहणार आहेत.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या 192 शॉपिंग गाळ्यांच्या बांधकामाच्या बाबतीत कोणती अनियमितता झाली, त्यास कोण जबाबदार आहेत. याबाबत सखोल चौकशी करून 30 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश पणन संचालनालयाचे सहसंचालक विनायक कोकरे यांनी समितीला आदेश दिलेले आहेत. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ही समिती चौकशी सुरू करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.