उद्योजक अशोक जैन, आ. राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती
जळगांव (प्रतिनिधी) :- भरारी फाउंडेशनतर्फे सागर पार्कवर सुरू असलेल्या बहिणाबाई महोत्सवात रविवारी जळगावकरांना एक वेगळा अनुभव मिळाला. बाल कलावंतांच्या लावणी, महाविद्यालयीन कलाकारांचे भरतनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रमांनी रविवारची सायंकाळ चांगलीच रंगली होती. बहिणाबाई महोत्सव रविवारी रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा ठरला.
यातच शाहीर मीरा दळवी व सहकारी यांचा’ लावणी महाराष्ट्राची ‘ व प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध गायक रवींद्र खोमणे यांचा भारत गौरव पर्व हे कार्यक्रम रविवारी खास आकर्षण होते. तसेच यावेळी बहिणाबाई जीवनगौरव पुरस्काराने दलीचंद जैन, रजनीकांत कोठारी यांना तर वैद्यकीय, सामाजिक व औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत विशेष योगदान देणारे डॉ . प्रसन्नकुमार रेदासनी, डॉ. नंदा जैन,डॉ. पी. आर चौधरी, भालचंद्र पाटील, अनिल कांकरिया यांना मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी आ. सुरेश भोळे, जैन उद्योग समूहाचे अशोक जैन यांनी बहिणाबाई महोत्सवाच्या दहाव्या पर्वाला शुभेच्छा दिल्या. आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे, भालचंद्र पाटील, सचिन महाजन, सागर पगारीया, मोहित पाटील, अक्षय सोनवणे, रितेश लिमडा, अभिषेक बोरसे विक्रांत चौधरी, अभिषेक बोरसे, आकाश भावसार, मंगेश पाटील आदींची उपस्थिती होती.
सोमवारी शाहीर सुमित धुमाळ यांच्या शाहीर महाराष्ट्राचा प्राण या पोवाड्याचे आयोजन करण्यात आले असून पाच दिवसीय महोत्सवाचा सोमवारी सायंकाळी समारोप होईल असे दीपक परदेशी, विनोद ढगे यांनी सांगितले.