विविध स्टॉल्सला दिवसभरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव प्रतिनिधी : खान्देशच्या सांस्कृतिक वैभवाचा मानबिंदू असलेल्या ‘बहिणाबाई महोत्सवा’च्या ११ व्या पर्वात कलेचा नवा आविष्कार पाहायला मिळाला. महोत्सवाच्या विशेष आकर्षणापैकी एक असलेल्या फॅशन शोने जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले. आधुनिकता आणि परंपरेचा सुरेख संगम या कार्यक्रमात दिसून आला.


या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी महोत्सवाच्या आयोजनाचे कौतुक करत स्थानिक कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले.
फॅशन शोमध्ये विविध प्रकारच्या फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते. यात पारंपरिक वेशभूषेपासून ते वेस्टर्न आऊटफिट्सपर्यंत अनेक प्रकारांचा समावेश होता. आत्मविश्वासपूर्ण चाल आणि आकर्षक वेशभूषेतील मॉडेल्सनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या फॅशन शोला पाहण्यासाठी जळगावकरांनी मोठी गर्दी केली होती. टाळ्यांच्या कडकडाटाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
खान्देशच्या मातीत रंगलेल्या या महोत्सवातील फॅशन शोने तरुण पिढीमध्ये विशेष उत्साह निर्माण केला असून, सोशल मीडियावरही या कार्यक्रमाच्या फोटोंची सध्या चर्चा रंगली आहे.

“बहिणाबाई महोत्सवाने केवळ संस्कृतीच नाही, तर नव्या पिढीच्या कौशल्यालाही संधी दिली आहे, हे या फॅशन शोच्या माध्यमातून सिद्ध झाले.”
– मिनल करणवाल, सीइओ









