जळगाव जिल्ह्यातील सुमारे ५० जणांचा समावेश
जळगाव (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या आरोग्य सेवा विभागातील आयुक्तालयातर्फे गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या मंगळवारी १३ रोजी करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील सुमारे ४५ ते ५० जणांचा समावेश असल्याची माहिती मिळत असून शहराजवळ असणाऱ्या मोहाडी स्त्री रुग्णालयात ५ परिचारिकांची बदली झाली आहे.
सदर बदल्या संगणकीय ॲप प्रणालीव्दारे करण्यात आलेल्या आहे. बदली करण्यात आलेल्या कर्मचा-यास त्यांच्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होण्याकरिता तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे आणि संबंधित कर्मचा-याने त्यांना दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरीत हजर होऊन त्याबाबतचा अहवाल सबंधित नियुक्ती प्राधिकारी आणि संचालक, आरोग्य सेवा, पुणे यांना सादर करावा, आदेश पत्रात नमूद आहे. संचालक नितीन अंबाडेकर यांच्या सहीनिशी नियुक्तीचे पत्र संबंधित कर्मचारी, परिचारिकांना मिळाले आहे.
परिचारिकासह लिपिक, भौतिकोपचारतज्ज्ञ आदींची बदली झाली आहे. सदर बदल्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील ४५ ते ५० जणांचा समावेश असून जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिकांचाही यात समावेश आहे. येथील सामान्य रुग्णालयातील दोन्ही फिजिओथेरपिस्ट नितीन महाजन यांची नाशिक जिल्हा रुग्णालय, डॉ. अमित वाघदे यांची धुळे जिल्हा रुग्णालयात बदली झाली आहे. तर समाजसेवा अधीक्षक संदीप बागुल यांची शेगाव उप जिल्हा रुग्णालय, सिटी स्कॅन विभागातील पी. के. पाटील यांची न्हावी ग्रामीण रुग्णालय, क्ष किरण विभागातील सर्फराज तडवी यांची धरणगाव ग्रामीण रुग्णालय येथे बदली झाली आहे.
पॅथॉलॉजी विभागातील जयंत नेहेते यांना न्हावी ग्रामीण रुग्णालय देण्यात आले आहे. फार्मासिस्ट नारायण वाणी यांची मोहाडी स्त्री रुग्णालयात बदली झाली. प्रयोगशाळा तंत्रज्ञ विनोद चौधरी क्षयरोग रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात बदली झाली. प्रत्येकाला वैयक्तिक आदेश पाठविण्यात आली असल्याने इतर जणांच्या बदल्यांबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही.