नशिराबाद पोलिसांचे ओळख पटविण्याचे आवाहन
जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील भादली ते भुसावळ दरम्यानच्या रेल्वे लाईनवर मंगळवारी, ५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एका अनोळखी तरुणाचा धावत्या रेल्वेच्या धडकेने जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सायंकाळी ५ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
भादली ते भुसावळ दरम्यानच्या रेल्वे रुळांच्या डाऊन लाईनजवळ अंदाजे ३० वर्षीय अनोळखी तरुणाला धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागला. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच, नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. मृतदेहाची ओळख पटवण्यासारखी कोणतीही माहिती पोलिसांना अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे नशिराबाद पोलिसांनी या तरुणाची ओळख पटवण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार शरद भालेराव करत आहेत.