शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनऔषध वैद्यक शास्त्र विभागमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये सकाळीं भाऊंचे उद्यान येथे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय जळगांव यांच्या समन्वयाने जनजागृतीपर प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर सिंधी कॉलनी परिसरातील चेतनदास मेहता महानगरपालिका रूग्णालय आणि अधिष्ठाता कार्यालय येथे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी अवयवदान विषयावर पथनाट्य सादर केले.
भारतात दरवर्षी रुग्णांमध्ये मूत्रपिंड, यकृत या सारख्या अवयवांच्या निकामी होण्याचे प्रमाण वाढत असून याची संख्या आता लाखांमध्ये पोचली आहे. तसेच दरवर्षी अंदाजे १.६ लक्ष मृत्यू रस्ते दुर्घटनेमुळे होतात. याचाच अर्थ दरवर्षी जवळपास १ लक्ष इतके अवयव दाते तयार होऊ शकतात. तथापि प्रत्यक्षात अत्यल्प प्रमाणात अवयव दान केले जाते. या साठी जनमानसात व्यापक प्रमाणात जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे, अशी माहिती जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. योगिता बावस्कर यांनी दिली.
कार्यक्रमावेळी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, अधिसेविका प्रणिता गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. सुनयना कुमठेकर, नोडल अधिकारी, डॉ. दिपक वाणी यांनी विशेष परिश्रम घेतले.