अहमदनगर ( प्रतिनिधी ) – अवकाळी पावसामुळे संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ व खंदरमाळवाडी शिवारात २० मेंढ्या व कोकरांचा काल मृत्यू झाला
या मेंढपाळांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागात बुधवारी काही प्रमाणात अवकाळी पाऊस झाला याचा फटका मेंढपाळांनाही बसत आहे.
पठारभागात चाऱ्याचा तुटवडा असल्याने दरवर्षी साकुर पठार भागातील मेंढपाळ पुणे जिल्ह्यात मेंढ्या चारण्यासाठी जातात. सतु सोडनर, संदीप जांबुळकर, संजु झिटे (सर्व रा – मांडवे बु. ता.संगमनेर), सिद्धु कोकरे (रा. चिंचेवाडी) , पोपट कुदनर (रा.शिंदोडी), मारुती कुळाळ रा. जांबुत बु.) हे मेंढपाळ काही दिवसांपूर्वी मेंढ्या घेऊन पुणे जिल्ह्यात गेले होते. ते पुन्हा साकुर पठारभागात परतत असताना, नांदूर खंदरमाळ व खंदरमाळ येथील माळरानावर मुक्कामी होते. मात्र, अवकाळी पावसाने व थंडीने २० मेंढ्या व कोकरांचा मृत्यू झाला आहे. तलाठी युवराजसिंग जारवाल, महसूल कर्मचारी गणेश सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी भास्कर कुतळ यांनी घटनास्थळी पंचनामा केला.