रावेर पोलिसांची कारवाई, संशयितासह वाहन जप्त
रावेर (प्रतिनिधी) : छोट्या मालवाहू वाहनात पशुधन निर्दयतेने कोंबून विना परवाना वाहतूक करीत असलेले वाहन एम.एच. ०४/ एफ.डी. ३५४३ रावेर पोलिसांनी रावेर रसलपूर रोडवरील शिंदखेडा फाट्यावर पकडले. यावेळी वाहनातील ५ गायींची मुक्तता करण्यात आली. ही कारवाई ८ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास करून संशयित आरोपीला गजाआड केले आहे.
संशयित आरोपी शेख ऐफस शेख अफजल (वय २८, रा. सिद्धार्थ नगर, रावेर) हा त्याच्या मालवाहू वाहनातून दीड ते तीन वर्षे वयोगटातील ५८ हजार रुपये किमतीच्या पाच देशी व जर्सी गायींची विना परवाना वाहतूक करीत असताना संशयास्पद आढळून आला.
गस्तीवरील रावेर पोलिस पथकाने हे वाहन जप्त करून त्यातील पाचही गायींना जीवदान दिले. त्यांची गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, १ लाख किमतीचे छोटे मालवाहू वाहन व ५८ हजार रुपयांच्या गायी असा १ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करून आरोपी शेख ऐफाज शेख अफजल यास रावेर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिस कॉन्स्टेबल राहुल ईश्वर परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात आरोपी विरुध्द गोवंश हत्याबंदी, गोवंश अवैध वाहतूक व प्राण्यांच्या अमानुष छळ प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रावेर पोलिस स्टेशनचे फौजदार घनश्याम तांबे करीत आहेत.