दोघांना अटक, एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिंचोली येथून जळगाव शहराकडे ९ गाई- गोऱ्ह्यांची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या वाहनाला गोपनीय माहिती मिळाल्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी पकडले. त्यानुसार दोघांना अटक करण्यात आली असून गाई गोऱ्हे यांची रवानगी अहिंसा गो शाळेत करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना मंगळवारी दि. १६ एप्रिल रोजी सकाळी गोपनीय माहिती मिळाली. अज्ञात व्यक्ती या चिंचोली मार्गे जळगाव येथे आठ गोऱ्हे व एक गाय घेऊन जळगावला येत आहे. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी रेमंड चौफुली परिसरात सापळा रचला. माहिती नुसार वर्णनाची वाहन येताच् त्याला थांबवले. वाहनाची तपासणी केली असता त्यात आठ गोऱ्हे व एक गाय हे अवैधरित्या कोंबून वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले.
याप्रकरणी पोलिसांनी वाहन हे पोलीस स्टेशनला आणले. वाहनावरील चालक मोहन कौतिक ढेंगे (वय ७२, रा. रिंगणगाव सावदा ता. रावेर) याला ताब्यात घेण्यात आले. तर त्याचा मालक असलम खान गनी खान (वय ४४, रा.जळगाव) यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांना अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्याकडून एकूण ३ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गाईंची रवानगी ही गोशाळेत करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर डापकर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, छगन तायडे, सिद्धेश्वर डापकर, नितीन ठाकूर आदींनी ही कारवाई केली आहे.