रावेर ते चोरवड रस्त्यावर वन विभागाची कारवाई
रावेर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर रावेर वन विभागाने अवैध लाकूड भरलेल्या एका आयशर ट्रकवर कारवाई करत तस्करीचा डाव उधळला आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आणि वाहने पुढील कारवाईसाठी तत्काळ मध्य प्रदेश वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.
रावेर वन परिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांना मिळालेल्या माहितीनुसार, रावेर वन विभागाच्या पथकाने रावेर ते चोरवड रस्त्यावर मध्य प्रदेश सीमेलगत विशेष गस्त मोहीम राबवली. याच गस्तीदरम्यान, लोणी गावाजवळ संशयास्पद स्थितीत (एमएच ०४ सीयु ५४१८) क्रमांकाचा एक आयशर ट्रक आणि (एमएच १९ झेड ७८६२) क्रमांकाचा एक ट्रक आढळून आला.(केसीएन)पथकाने त्वरित या दोन्ही वाहनांची तपासणी केली असता, त्यात विनापरवाना पंचरास जातीचे लाकूड भरलेले आढळले. जप्त केलेल्या लाकडाचा अंदाजे साठा ३१ घनमीटर इतका असून, त्याची बाजारपेठेतील किंमत सुमारे ४३ हजार ४०० रुपये इतकी आहे. या लाकडासह जप्त करण्यात आलेल्या दोन्ही वाहनांची अंदाजे किंमत ५ लाख ३० हजार रुपये इतकी आहे.
अवैध लाकूड वाहतुकीचा गुन्हा प्रत्यक्ष मध्य प्रदेश राज्याच्या हद्दीत घडल्याचे समोर आले. यानंतर रावेर वन विभागाने मध्य प्रदेश वन विभागाशी संपर्क साधला आणि त्यांना घटनेची संपूर्ण माहिती दिली. माहिती मिळताच मध्य प्रदेश वन विभागाचे वनपाल युनुस दाऊदी, वनरक्षक आर.डी. काजळे आणि वीरेंद्र कुमार हे घटनास्थळी हजर झाले.(केसीएन)त्यांनी रावेर वन विभागाच्या पथकाकडून जप्त करण्यात आलेले वाहन आणि लाकडाचा मुद्देमाल रीतसर ताब्यात घेतला. या गुन्ह्यासंबंधी पुढील सर्व कायदेशीर कारवाई आता मध्य प्रदेश वन विभागाकडून केली जाणार आहे. वनपाल अरविंद धोबी, वनरक्षक सहस्त्रलिंग, आयेशा पिंजारी, जगदीश जगदाळे, वनमजूर सुभाष माळी आणि वाहन चालक विनोद पाटील यांनी कारवाई केली.