उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाची कारवाई
जळगाव ( प्रतिनिधी ) – भरवस्तीमध्ये राहत्या घरात घरगुती वापराच्या गॅस सिलींडरचा साठा करुन त्याद्वारे गॅस रिफिलींग करणाऱ्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या पथकाने छापा टाकला. या ठिकाणाहून घरगुती वापराचे ३ भरलेले गॅस सिलींडर व गॅस भरण्याचे साहित्य असा एकूण १९ हजार ९५० रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई शनिवार दि. ६ रोजी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल नगरात केली.
याप्रकरणी शशिकांत शिवाजी मराठे (वय ४५, मारोती मंदिरासमोर, हरिविठ्ठलनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील हरिविठ्ठल नगरातील मारोती मंदिरासमोरील एका घरामध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलींडरमधून बेकायदेशीररित्या दुसऱ्या गॅस हंडीमध्ये गॅस रिफिलींग होत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांना मिळाली. त्यांनी लागलीच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पोहेकॉ उमेश पाटील, प्रमोद पाटील, राहुल चौधरी, विठ्ठल फुसे यांचे पथक तयार करुन कारवाईसाठी रवाना केले. या पथकाने मारोती मंदिरासमोरील शशिकांत मराठे यांच्या घरात छापा टाकला. केलेल्या कारवाईत एका सिलींडरमधून दुसऱ्या सिलींडरमध्ये गॅस रिफीलींग करतांना मिळून आले.
पोलिसांच्या पथकाने घरामध्ये गॅस रिफिलींग होत असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी लागलीच कारवाईसाठी पुरवठा कार्यालयात संपर्क केला. मात्र शनिवार असल्यामुळे पुरवठा निरीक्षण अधिकारी उपलब्ध होवू शकले नाही. त्यामुळे पोलिसांनी त्या घरावर छापा टाकीत कारवाई केली. याप्रकरणी गॅस रिफिलींग करणाऱ्या शशिकांत शिवाजी मराठे (वय ४५, रा. मारोती मंदिरासमोर, हरिविठ्ठलनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणाहून तीन घरगुती वापराचे भरलेले गॅस सिलींडर, गॅस भरण्याची मोटार, वजन काटा, रेग्युलेटर असा एकूण १९ हजार ९५० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.









