पारोळा (प्रतिनिधी ) – बोळे रस्त्यालगत अवैध दारूसाठा केल्याप्रकरणी धमाणे (ता. धुळे) येथील आरोपी शांताराम शिरसाठ याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्यास पारोळा न्यायालयाने २५ हजारांचा दंड किंवा दंड न भरल्यास पाच महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
आरोपी शांताराम राजधर शिरसाठ (रा. धमाणे, ता. जि. धुळे) याच्या ताब्यात २६ जुलै २०१८ ला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास करंजी शिवारात बोळे रस्त्याच्या बाजूला कुडाच्या झोपडीत अवैधरित्या दारुच्या ८ हजार ११० रुपये किमतीच्या एकूण ९७ बाटल्या आढळून आल्या. त्याद्वारे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ ई अन्वये गुन्हा केल्याचा दोषारोप आरोपी शांताराम यांच्यावर ठेवण्यात आला होता. आरोपी शांताराम याच्यावर न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्याने मंगळवारी (ता. १२) न्यायाधीश एम. एस. काझी यांनी आरोपी शांताराम राजधर शिरसाठ (रा. धमाणे, पो. देवभाने ता. जि. धुळे) यास २५ हजारांचा दंड किंवा दंड न भरल्यास पाच महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात सहाय्यक सरकारी अभियोक्ता पी. बी. मगर यांनी सरकारतर्फे युक्तिवाद केला. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, जळगावचे दुय्यम निरीक्षक एम. बी. सोनार यांनी या गुन्ह्याचा तपास केला.