औरंगाबाद ( प्रतिनिधी ) – डिलिव्हरीसाठी आलेल्या महिलेचे अवाढव्य वजन मोजण्यासाठी विशेष वजन काट्याची व्यवस्था करावी लागली. तपासण्या केल्यानंतर प्रसूतीची वेळ आली. पण महिलेच्या डिलिव्हरीसाठी साधारण ऑपरेशन टेबल पुरतोय कुठे, औरंगाबादमधील घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी हे आव्हान पेलायचं आणि सुखरुप डिलिव्हरी करायची, असा निश्चय केला आणि यशस्वीदेखील झाला. सिझेरियन प्रसूतीनंतर आता माता आणि बाळ सुखरुप आहेत.एवढा जास्त बॉडी मास इंडेक्स असलेल्या जगातील फक्त सहाच महिलांवर अशी शस्त्रक्रिया झाली होती. औरंगाबादमधली ही सातवी केस ठरली.
घाटी रुग्णालयात जगातील अशा प्रकारची अत्यंत गुंतागुंतीची सातवी शस्त्रक्रिया पार पडली. अशी माहिती येथील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी दिली. या केसची हिस्ट्री सांगताना ते म्हणाले, ही 27 वर्षीय महिला घाटीतील डॉ. विजय कल्याणकर यांच्या पथक क्रमांक 3 मध्ये दाखल होऊन उपचार घेत होती. तिचे वजन 155 किलो असून उच्च रक्तदाब, मधुमेह होता. तसेच तेवढ्या आकाराचा ना ऑपरेशन टेबल बोता, ना रुग्णाच्या आकाराचा गाऊन. अखेर हे आव्हान पेलायचंच, असं डॉक्टरांनी ठरवलं. 24 जानेवारी रोजी ही गुंतागुंतीची सिझेरियन प्रसूती यशस्वी करण्यात आली.
सामान्यतः महिलांचा बॉडी मास इमडेक्स 20 ते 25 दरम्यान असतो. मात्र या महिलेचा बीएमआय 66 होता. रक्तदाब मोजण्याच्या यंत्रात महिलेचा दंड मावत नव्हता. म्हणून खास उपकरण आणावे लागले. वजन मोजण्यासाठीही मोंढ्यात असतो, तसा काटा आणण्यात आला. सिझेरियन करण्यासाठी दोन मोठे ऑपरेशन टेबल जोडण्यात आले. सामान्य सिझेरियन करण्यासाठी पाऊण तास पुरतो, पण या महिलेच्या प्रसूतीसाठी अडीच तास लागले. अशा केसमध्ये रक्ताच्या गाठी होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यासाठी विशेष इंजेक्शनचा डोसही देण्यात आला. महिलेने 3.5 किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला. हे तिचे दुसरे अपत्य आहे.
महिलेवर दोन महिन्यांपूर्वी उपचारास सुरुवात झाली. आधी ती एकाच जागी बसून राहत होती. त्यामुळे वॉर्डात तिला दररोज चालण्यास सांगितले गेले. फुप्फुसाचे व्यायाम करुन घेण्यात आले. शरीराच्या विविध भागांवर बुरशीचा संसर्ग होता. चरबी प्रचंड वाढल्याने बाळाचे ठोकेच ऐकू येत नव्हेत. त्यासाठी दिवसभरातून तीन वेळा सोनोग्राफीच्या माध्यमातून बाळाचे ठोके तपासले जात होते. तिला एका जागेवारून दुसरीकडे हलण्यासाठीही मदतीची गरज होती. प्रचंड वजनामुळे तिला सांभाळणेही कठीण होते. व्हीलचेअरमध्येही ती मावत नव्हती. अशा स्थितीत तिला हळू हळू प्रसूतीयोग्य बनवण्यात आले.
घाटीच्या वॉर्ड 26 मध्ये 11 दिवसांची बाळंतीण असलेली ही महिला म्हणाली, ही माझी दुसरी प्रसूती होती. वयाच्या 16 व्या वर्षापासून अचानकच वजन वाढत गेले. 2014 मध्ये लग्न झाले. तेव्हा वजन 90 किलो होते. वजनामुळे आजारही वाढले. 2017 साली पहिली प्रसूती झाली. आता दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी खूप हाल झाले. शासकीय रुग्णालयात रुग्णांचे हाल होतात, असे ऐकले होते, पण माझ्यासाठी डॉक्टरांची टीम रात्रंदिवस काम करत होती. आज त्यांच्यामुळेच मी जिवंत असल्याचे तिने सांगितले.