समाज कल्याण विभागामार्फत आयोजन, जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती
जळगाव (प्रतिनिधी) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे व सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम व त्यामधील सुधारणाअंतर्गत जनजागृती आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यशाळा दि. २९ जुलै रोजी अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह नयना बोदर्डे (अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती), अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते, जिल्हा शासकीय अभियोक्ता सुरेंद्र काबरा, नंदा रायते (सहायक आयुक्त, समाज कल्याण), राजेंद्र कांबळे (विशेष अधिकारी, शासकीय निवासी शाळा), यशदा पुणेचे प्रशिक्षक सुभाष केकाण, सचिन गिरमे (प्रकल्प अधिकारी, बार्टी) उपस्थित होते.
कार्यशाळेच्या प्रारंभी प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त नंदा रायते यांनी केले. यावेळी त्यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली आणि त्याचा समाजातील सकारात्मक प्रभाव स्पष्ट केला.याप्रसंगी कार्यशाळेच्या उद्घाटनपर मनोगतात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सामाजिक परिस्थिती सुधारणा करण्यासाठी कायदयाची भुमिका स्पष्ट केली तर डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आपल्या मनोगतात कायद्याची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कार्यशाळचे महत्व विषद करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेमध्ये पोलिस, महसूल व ग्राम विकास विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मोठया संख्येने सहभाग नोंदवला. कायद्यातील महत्वाची कलमे, तपास प्रक्रिया,न्यायालयीन प्रक्रिया, कायदा अंमलबजावणीतील अडथळे, तसेच पीडित व्यक्तींना मिळणारी मदत याबाबत जिल्हा शासकीय अभियोक्ता सुरेंद्र काबरा व यशदा पुणेचे प्रशिक्षक सुभाष केकाण या तज्ज्ञ मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पगारे,तालुका समन्वयक, समाज कल्याण तथा बार्टी यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र कांबळे, विशेष अधिकारी शासकीय निवासी शाळा यांनी मानले. ही कार्यशाळा अधिकाऱ्यांमध्ये संवेदनशीलता निर्माण करून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे तसेच जातीय सलोखा, कायद्यानुसार न्यायप्रक्रिया आणि सामाजिक समतेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली.