जळगाव ( प्रतिनिधी ) – ऑटोनगरात वर्कशॉप मालकाने एका झाडाला गळफासाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली होती .
ऑटोनगरात मारोती बब्रुवान जाधव ( वय ४० , रा – अयोध्यानगर ) यांचे बालाजी मोटार बॉडी रिपेअरिंग वर्कशॉप आहे . ते या भागातील मोकळ्या जागेतील एका झाडाला दोरीने गळफास घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे लक्षात आल्यावर प्रमोद वाणी गॅरेजवाला यांनी त्यांच्या गळफासाला लावलेली दोरी कापून त्यांना खाली उतरवले आणि त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले .
मारोती जाधव यांचा मुलगा मंगेश जाधव याने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या वर्कशॉप शेजारी असलेल्या साईबाबा मंदिराच्या विश्व्स्त संस्थेच्या विश्वस्तांच्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असावा . या वर्कशॉप शेजारी साईबाबा मंदिर विश्वस्त संस्थेची मोकळी जागा आहे . या मोकळ्या जागेच्या संरक्षक भिंतीला गेट ठेऊन जाधव यांच्या गायीला येण्या जाण्याची वाट करून देण्यास या विश्वस्तांचा विरोध आहे . यावरून ते लोक मारोती जाधव यांना मानसिक त्रास देत होते असे त्यांच्या मुलाने सांगितले . खरे तर या मोकळ्या जागेत अनेक वाहने कित्येक तास उभी राहतात त्यावर कुणी हरकत घेत नाही मात्र आमच्या गायीवरच आक्षेप घेतला जातो , असेही मंगेश जाधव म्हणाला.