जळगाव तालुक्यात भोकर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील भोकर येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका ४३ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण भोकर परिसरात शोककळा पसरली आहे.

संगीता देविदास बारोड (वय ४३, रा. भोकर, ता. जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास संगीता आणि त्यांचे पती देविदास बारोड हे दोघेही घरात टीव्ही पाहत बसले होते.(केसीएन)काही वेळाने चहा पिण्याची इच्छा झाल्याने संगीता या चहा करण्यासाठी स्वयंपाक घरात गेल्या. यादरम्यान पती देविदास यांचा डोळा लागला आणि ते काही काळ झोपले. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास जेव्हा पतीला जाग आली, तेव्हा त्यांना पत्नी संगीता घरात दिसली नाही. त्यांनी शोध घेतला असता मागच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी वारंवार दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून देविदास बारोड यांनी आजूबाजूच्या नागरिकांना मदतीसाठी बोलावले. गावकऱ्यांच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडण्यात आला.(केसीएन)यावेळी संगीता यांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्या. त्यांना तातडीने खाली उतरवून ग्रामस्थांच्या मदतीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना ‘मृत’ घोषित केले.
मयत संगीता बारोड यांच्या पश्चात पती देविदास बारोड आणि सासरे असा परिवार आहे. पती देविदास हे शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. संगीता यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.









