आई बाहेर गेल्यावर संपवलं आयुष्य
जळगाव प्रतिनिधी – शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आजाराशी झुंज देणाऱ्या एका ३४ वर्षीय तरुणाने घरात कुणीही नसताना गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. गणेश समाधान अहिरे (वय ३४, रा. जुने जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

गणेश अहिरे हा आपल्या आईसोबत जुने जळगाव भागात राहत होता. तो गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजारी असल्याने शारीरिक आणि मानसिक त्रासात होता.(केसीएन)शुक्रवारी दि २३ रोजी त्याची आई काही कामासाठी घराबाहेर गेली होती. घरात कुणीही नसताना गणेशने टोकाचे पाऊल उचलले आणि गळफास घेऊन आत्महत्या केली.
आई जेव्हा बाहेरून घरी परतली, तेव्हा तिला मुलगा बेशुद्ध अवस्थेत दिसून आला. हा प्रकार पाहून त्यांनी हंबरडा फोडला.(केसीएन)तात्काळ परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि गणेशला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला ‘मृत’ घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आजारपणाला कंटाळूनच त्याने हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज नातेवाईकांकडून वर्तवण्यात येत आहे. गणेशच्या जाण्याने त्याच्या वृद्ध आईवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.









