अमळनेर तालुक्यातील सावखेडा परिसरातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- येथील रहिवासी, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकाने सावखेडा तापी नदी पुलावरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राजेंद्र रामदास लोहारे (वय ६१) असे मयत सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, बहिण, असा परिवार आहे. ते माध्यमिक शिक्षक प्रदीप लोहारे यांचे मोठे बंधू तर अमळनेर एलआयसी ऑफिसर मयूर लोहारे यांचे वडील होते. राजेंद्र लोहारे यांनी दि.१० रोजी दुपारी पातोंडा पासून जवळच असलेल्या सावखेडा तापी नदीवरून उडी मारत आत्महत्या केली. भाऊ प्रदीप लोहारे यांना सायंकाळी कळताच त्यांनी नदीकाठी शोधाशोध केली.
शुक्रवारी सकाळी मुंगसे-दापोरी गावाच्या नदीकाठी मृतदेह आढळला असल्याची माहिती मिळाली. अमळनेर पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. सदर आत्महत्या त्यांनी दीर्घ आजाराच्या नैराश्यपोटी केली असल्याची शक्यता नातेवाईकांनी वर्तवली.