जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कानळदा येथील बावीस वर्षीय तरुणाने कुठल्यातरी नैराश्याखाली येऊन झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी २१ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राहुल रविंद्र सोनवणे (वय २२, रा. कानळदा) असे मयत तरुणाचे नाव आहे. सध्या काहीच काम धंदा करीत नसल्याने तो गावात लोकांच्या शेतामध्ये मदत करायला जात होता अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. गुरुवारी दुपारी ४ वाजेनंतर कधीतरी त्याने नारायण राणे यांच्या शेतामध्ये जाऊन चिकूच्या झाडाला गळफास घेतला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
दरम्यान ही घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजेला शेतमजुरांमुळे उघडकीस आली. ग्रामस्थांनी राहुल सोनवणेचा मृतदेह खाली उतरून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे रवाना केला. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल पाटील यांनी त्यास मयत घोषित केले.
दरम्यान घटनेप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत राहुल सोनवणे यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.