पुणे (वृत्तसंस्था ) ;- पुणे पोलीस दलातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपायाने पुणे शहरातील तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे, अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली. अनुष्का सुहास केदार (वय-20 वर्षे, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी) असे इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केलेल्या महिला पोलीस शिपायाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात शिपाई पोलीस म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्या पुणे ग्रामीण मुख्यालयमध्ये नेमणुकीस आहेत. दिघी- वडमुखवाडी या परिसरात राहणाऱ्या अनुष्का यांनी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चाकणकडे जाणाऱ्या पुलावरील गरुड खांबापासून इंद्रायणी नदीत उडी घेतली आहे.