चाळीसगावात ६४ लाख ८२ हजारांचा घोटाळा
चाळीसगाव (प्रतिनिधी) : – बॅंकांच्या ‘एटीएम’ च्या पैशांचा गैरव्यवहार करणाऱ्या तिघा संशयितांकडून पोलिसांनी रोकडसह मुद्देमाल जप्त केला आहे. यातील काही रक्कम व मुद्देमाल अजून ताब्यात घेणे बाकी असून, ज्यांनी या संशयितांकडून पैसे घेतलेले आहेत, अशांना पोलिसात जमा करण्याबाबत नोटीस देण्यात आल्या आहेत. त्यांनी त्यांच्याकडील रक्कम जमा केली नाही तर त्यांनाही या गुन्ह्यात आरोपी केले जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
प्रवीण देविदास गुरव (वय ३८), दीपक भिकन पवार (वय ३४, दोन्ही रा. पाटणदेवी रोड, आदित्यनगर) हे दोघे खासगी कंपनीमार्फत कस्टोडियन म्हणून बँकामधून रोख रक्कम काढून ‘एटीएम’मध्ये भरण्याचे काम करतात. या दोघांनी मे ते डिसेंबर २०२३ दरम्यान वेळोवेळी थोडी थोडी रक्कम मिळून एकूण ६४ लाख ८२ हजार २०० रुपये परस्पर काढून ते आपापसांत वाटून घेतले. हा गैरव्यवहार ऑडिटर चंद्रशेखर एकनाथ गुरव (वय ४३, रा. गुजराल पेट्रोलपंपाजवळ, निवृत्तीनगर, जळगाव) यांना लक्षात आला. मात्र, त्यांनी याबाबत कंपनीला न कळवता त्याने दोन्ही संशयितांना मदत करून कंपनीला खोटा ऑडिट अहवाल तयार करून पाठविला.
हा प्रकार लक्षात येताच १८ डिसेंबरला गोरक्षनाथ पोपट डोंगरे (वय ३८, रा. पंचवटी, नाशिक) यांनी पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली. या गुन्ह्याचा सखोल तपास झाल्यावर तपासादरम्यान पोलीस पथकाने तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने व गैरव्यवहाराच्या रकमेतून घेतलेली कार असा एकूण १९ लाख ४२ हजार ९६० रुपयांचा ऐवज हस्तगत केला. दरम्यान, आरोपींनी गैरव्यवहार केलेली उर्वरित रक्कम त्यांच्या परिचयातील काही व्यक्तींना दिलेली असून, ही रक्कम देखील पोलिसांकडून हस्तगत केली जात आहे. ज्यांनी या संशयितांकडून हे पैसे घेतले असतील त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन रक्कम जमा करण्याबाबत काहींना नोटीस देण्यात आल्या आहेत.