भुसावळ शहरातील जामनेर रस्त्यावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जामनेर रोडवरील एटीएम सेंटर येथे प्रौढ व्यक्तीची मदत करण्याचा बहाणा करून त्याचे एटीएम अदलाबदल करून नंतर त्याच्या खात्यातून ५६ हजार रुपये काढून घेत फसवणूक केल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतशरण गुप्ता (वय ६२) हे सेवानिवृत्त रेल्वे अभियंता आहेत. ते भुसावळ शहरात अनिल नगर येथे राहतात. दि. १२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ते जामनेर रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेच्या एटीएम सेंटर येथे गेले होते. तेथे एक अज्ञात व्यक्ती आली. त्या व्यक्तीने संतशरण गुप्ता यांचा विश्वास संपादन केला.(केसीएन)तसेच मदत करण्याचा बहाणा करून फिर्यादी संतशरण यांच्याकडील एटीएम कार्डाची कपटीपणाने अदलाबदली केली. नंतर या एटीएम कार्डचा वापर करून वेळोवेळी ७ वेळा ५६ हजार ७११ रुपये काढून घेत फसवणूक केली. याबाबत माहिती कळताच फिर्यादीने तातडीने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार शनिवारी १९ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल महेश चौधरी करीत आहेत.









