जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात पुन्हा एकदा एटीएम फसवणुकीचा प्रकार समोर आला असून, मदत करण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून ठेवत अनोळखी व्यक्तीने एटीएम कार्डची अदलाबदली करत ८९ वर्षीय वृद्धाच्या खात्यातून तब्बल २८ हजार रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना दि. ६ नोव्हेंबर रोजी घडली असून, याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राधाकृष्ण नगरातील गजानन साहेबराव पाटील हे आपल्या वडिल साहेबराव ओंकार पाटील (वय ८९) यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिंगरोड शाखेतील खात्याचे एटीएम कार्ड घेऊन शहरातील मुख्य शाखेच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. मात्र, वारंवार प्रयत्न करूनही पैसे न निघाल्याने त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवत “मी मदत करतो” असे म्हणत हातचलाखीने मूळ एटीएम कार्ड बदलून दुसरे कार्ड त्यांच्या हातात दिले. त्यानंतर तो संशयित व्यक्ती तेथून निघून गेला.
थोड्याच वेळाने गजानन पाटील यांनी पुन्हा एटीएम वापरण्याचा प्रयत्न केला असता कार्ड ‘ब्लॉक’ झाल्याचे स्क्रीनवर दिसले. रात्री त्यांनी वडीलांच्या खात्याचे स्टेटमेंट तपासले असता, खातेातून २८ हजार रुपये परस्पर काढल्याचे समोर आले. तत्काळ त्यांनी बँकेत धाव घेऊन प्रकार कळविला. बँक व्यवस्थापकांनी संबंधित एटीएम कार्ड ब्लॉक करून आवश्यक ती प्रक्रिया सुरू केली.
शेवटी गजानन पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, एटीएम परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
या घटनेनंतर नागरिकांना पोलिसांनी इशारा देत सांगितले आहे की, एटीएममध्ये व्यवहार करताना अपरिचित व्यक्तींच्या मदतीचा स्वीकार करू नये तसेच कोणत्याही परिस्थितीत आपले कार्ड, पिन अथवा बँक तपशील दुसऱ्याला देऊ नये.









