भडगाव ( प्रतिनिधी ) – एटीएमचा पीन क्रमांक विचारून बँक खात्यातून 7 लाख 19 हजार रुपये काढून महिलेची फसवणूक करणाऱ्या भामट्याविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
नयन आननसिंग गढरी (19 रा. पिंपरखेड , ता. भडगाव) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, 24 ते 31 जानेवारी दरम्यान अज्ञात चोरट्याने त्याची आई कविता गढरी यांच्या खात्यातून पैसे काढून घेतले. गढरी यांचे पिंपरखेड येथील बँक ऑफ बडोदा शाखेत खाते आहे. काही दिवसांपूर्वी नयन गढरी आईसोबत पिंपरखेडहून भडगावला येत होता. त्यांची दुचाकी घसरली होती. कविता गढरी यांना किरकोळ मार लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल केले होते. नयन आईच्या एटीएमद्वारे बसस्थानकासमोरील ऍक्सिस बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यास गेला होता पैसे निघत नसल्याने त्याला अनोळखी व्यक्तीने मदत म्हणून एटीएमचा पीन क्रमांक विचारला होता. यानंतर गढरी पिंपरखेड येथील बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्या असता, त्यांच्या खात्यातून सात लाख 19 हजार रूपये काढून घेतले असून खात्यात एकही पैसा शिल्लक नसल्याचे दिसून आले. पैसे काढण्यासाठी मदत करणार्या व्यक्तीने हा प्रकार केल्याचा संशय नयन गढरी यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. भडगाव पोलीस तपास करत आहेत.